१६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात; विशेष मोहिमेत मोठे यश
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 24 जून 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
तब्बल सोळा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विशेष फरार व पाहिजे आरोपी शोध मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा न्यायालयातील आरसीसी क्रमांक २०५/२०१० मधील पाहिजे आरोपी उद्धव बाळासाहेब जठार (वय ४०, रा. कौठा, ता. श्रीगोंदा) हा आपल्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना प्राप्त झाली.
माहितीची पडताळणी केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. पथकाने वेशांतर करून आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. योग्य संधी साधत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला अटक करण्यात आली.
सदर आरोपी अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहत फरार होता. विशेष मोहिमेदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलुबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक खिळदकर, पोलीस नाईक गहिनीनाथ यादव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राऊत, विवेक दळवी, महादेव कोहक, काष्टी बिट अंमलदार पोहेकॉ मोरे, पोहेकॉ भांडवलकर, पोहेकाॅ. नितीन नरुटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली लाड तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल शरद चोभे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या विशेष शोध मोहिमेला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, फरार आरोपींविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
🔵🟡🔴🟠
