Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, ‘मेनन अँड जित्तू -333’ काय आहे?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २५ जून २०२६
बंगळूर: कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर येथे अटक करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील २० वर्षीय संशयित दहशतवादी सुहैल याच्या चौकशीत देशाला हादरवून सोडणारी माहिती समोर आल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला (Ram Temple security alert latest update) आहे.
प्राथमिक चौकशीत त्याने अयोध्येतील श्रीराम मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची इच्छा आणि त्यासाठी कट रचल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे.
हरिहर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या सुहैलची विविध सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याने, ‘अयोध्येतील श्रीराम मंदिरात स्फोट घडवून आणण्याची माझी इच्छा होती’, असे सांगितल्याचे सूत्रांनी नमूद केले. तथापि, या कथित कबुलीबाबत अधिकृत तपास यंत्रणांनी अद्याप सार्वजनिकरित्या सविस्तर माहिती दिलेली नाही.
मोबाईल तपासणीत आंतरराष्ट्रीय दुव्यांचे संकेत
तपासादरम्यान सुहैलच्या मोबाईल फोनमधून अनेक संशयास्पद माहितीचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानचा कंट्री कोड असलेल्या मोबाईल क्रमांकाची नोंद ‘राणा बॉय’ या नावाने सेव्ह असल्याचे आढळले. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया गट, शस्त्रास्त्रांसह काढलेली छायाचित्रे आणि काही गुप्त ऑनलाइन गटांमधील सक्रिय सहभागाचे पुरावे मिळाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
‘मेनन अँड जित्तू -३३३’ आणि ‘राणाभाई – ३३३ ‘ गटांशी संबंध?
पोलिस तपासात सुहैल हा ‘मेनन अँड जित्तू-३३३’ आणि ‘राणाभाई-३३३’ नावाच्या संशयास्पद ऑनलाइन गटांमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याचे वृत्त आहे. या गटांद्वारे देशविघातक कारवाया, कट्टरतावादी विचारांचा प्रसार आणि संभाव्य दहशतवादी नेटवर्कशी संपर्क ठेवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तुमकूर पोलिसांकडे हस्तांतरण
अधिक तपासासाठी सुहैलला मंगळवारी सायंकाळी तुमकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
पेंटरच्या वेशात हरिहरमध्ये वास्तव
सुहैल हा उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर परिसरातील रहिवासी असून हरिहरजवळील औद्योगिक भागातील एका कारखान्यात पेंटर म्हणून काम करत होता. मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली.
मोठ्या विध्वंसक कटाचा संशय
प्राथमिक तपासात सुहैल आणि त्याच्या संपर्कातील काही व्यक्ती भारतात विध्वंसक कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशातील अत्यंत संवेदनशील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतले जात असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथके आणि राज्य पोलिस यांच्यात समन्वयाने तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
🟣🟠🟢🔴
