खाजगी कार्यालयातील जनता दरबारावरून तहसील कार्यालयासमोर निदर्शने; तहसीलदारांना निवेदन
विश्व निर्माता न्यूज पोर्टल
श्रीगोंदा,४ ऑगस्ट २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी जनता दरबार त्यांच्या खाजगी कार्यालयात आयोजित केल्याच्या मुद्द्यावरून सोमवारी तहसील कार्यालयासमोर विरोधकांनी निदर्शने केली. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के, बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, भैय्या वाबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर उपस्थितांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सरकारी अधिकारी आमदारांच्या खाजगी कार्यालयात जाऊन जनता दरबारात सहभागी होणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करत याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच भविष्यात जनता दरबार तहसील कार्यालय किंवा इतर शासकीय कार्यालयातच आयोजित करण्यात यावा, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यापुढेही जनता दरबार खाजगी कार्यालयातच भरविण्याची प्रथा सुरू राहिल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी दिला. या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
🟠🟡🔵🔴
