भरदिवसा वृद्ध महिलेचे दागिने लंपास; श्रीगोंद्यात चोरट्यांचा सुळसुळाट!
दोन अनोळखी दुचाकीस्वारांकडून सोन्याची चैन व कानातील दागिने पळविले; श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल
विश्व निर्माता न्यूज पोर्टल
दि. 24/09/2026
श्रीगोंदा | प्रतिनिधी | साजित पठाण
श्रीगोंदा शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरात वृद्ध महिलेच्या अंगावरील तब्बल ९८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी संदीप झुंबर शेंडगे (वय ४०, रा. शेंडवाडी, रेल्वे स्टेशन रोड, श्रीगोंदा) यांच्या आई जाईबाई झुंबर शेंडगे (वय ७०) या २३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून त्यांच्याजवळ आले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दुचाकीवरील एका इसमाने जाईबाई यांच्याशी बोलण्याच्या बहाण्याने त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर दुसऱ्या इसमाने त्यांच्या अंगावरील सुमारे ७० हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची चैन तसेच सुमारे २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने असा एकूण ९८ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला आणि दोघेही दुचाकीवरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल जमुना जोगबापू बाजंगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, भरदिवसा वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वारांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मागणी होत आहे.
🟠🟡🔵🔴
