श्रीगोंद्यातील छत्रपती कॉलेजची पोलखोल; विद्यार्थ्यांच्या तक्रारींनी कारभारावर प्रश्नचिन्ह?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
दि. २० गुरुवार २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी : नाहीद पठाण
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील छत्रपती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढा समोर आला असून, कॉलेजच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्राउंडवर जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून,
कॉलेजमधील स्वच्छतागृह आणि मुतारीच्या अस्वच्छतेचा प्रश्नही गंभीर असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित स्वच्छता होत नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर कॉलेज परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असून, घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव असल्याचा आरोप आहे. सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने परिसरात सांडपाणी साचत असल्याने अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, कॉलेज परिसरात महापुरुषांच्या प्रतिमेजवळही घाण व कचरा साचलेला असल्याचे चित्र समोर आले आहे. महापुरुषांच्या प्रतिमेजवळ नियमित स्वच्छता न केल्याने परिसराची दुरवस्था झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. महापुरुषांच्या प्रतिमांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असताना प्रतिमेच्या परिसरातच अस्वच्छता दिसत असल्याने कॉलेज प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपयांची ‘डेव्हलपमेंट फी’ आकारली जात असल्याचीही तक्रार आहे. या शुल्कासाठी पांढरी व हिरवी पावती दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, हे शुल्क कोणत्या नियमांतर्गत आकारले जाते, त्याची अधिकृत मान्यता काय आहे आणि जमा होणाऱ्या रकमेचा वापर नेमका कशासाठी केला जातो, याबाबत कॉलेज प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांकडून विविध शुल्क आकारले जात असताना दुसरीकडे स्वच्छता, सांडपाणी निचरा, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांची अशी अवस्था का, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या सर्व तक्रारींबाबत कॉलेज प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
🔴🟠🟡🔵
