हैदराबाद ISPL मध्ये चमकणारा श्रीगोंद्याचा हिरा; जोशी समाजाच्या मातीतून घडलेला ‘लेफ्ट हॅण्डर’ करतोय देशभरात धुमाकूळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार १२ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा – मेहनत, माती आणि मनोबल यांची भट्टी जेव्हा तावून-सुलाखून एक खेळाडू घडवते, तेव्हा तो मुलगा थेट हैदराबादच्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL Hyderabad) च्या प्रकाशझोतात येतो. श्रीगोंद्याच्या या उदयोन्मुख क्रिकेटरची निवड जाहीर होताच गावापासून जिल्ह्यापर्यंत आणि समाजापासून राज्यापर्यंत सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
लहानपणापासून क्रिकेटची नाळ जिवात बसलेली. कारण वडील सुनील रावसाहेब गजरे स्वतः क्रिकेट खेळायचे. घरची परिस्थिती हलाखीची, भटकंती करणाऱ्या जोशी समाजाचे मूळ गाव, पण मुलांच्या भविष्यासाठी गजरेंनी केलेली कष्टमशागत म्हणजे जणू संघर्षपर्वाची धडाडी. “आपण भटकत जगलो, पण मुलांनी स्थिर उभं राहावं,” या बापाच्या हट्टाने या मुलाचे आयुष्यच बदलले.
➡️शिक्षणाचाही प्रवास तितकाच टप्प्याटप्प्याने आणि काटेकोर: पहिली ते चौथी – जिल्हा परिषद शाळा, जोशी वस्तीपाचवी ते दहावी – इंदिरा गांधी विद्यानिकेतन, श्रीगोंदा फॅक्टरी
अकरावी ते ग्रॅज्युएशन – छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा
गावात संतोष शेठ नागवडे इलेव्हनपासून सुरुवात. नंतर श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना टीम, पुढे हंमराज मृत्युंजय ग्रुप, पुणे, आणि मग व्यावसायिक क्रिकेटचा ठसा उमटवत त्यांनी आपला खेळ ‘लेफ्ट हॅण्ड बॅट्समन’ म्हणून धारदार केला.
या प्रवासात संतोष नागवडे, अशोक काळाने, तेजस जाधव, शिवाजी पोटे, तुषार वंजारे, ऋषिकेश जोहरी, मधुकर काळाने (पुणे), अभिजीत राऊत मिनीनाथ नागवडे, (पुणे) यांसह अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आज ISPL Hyderabad मध्ये निवड झाल्यावर त्यांनी पहिल्याच शब्दांत श्रेय दिले ते आपल्या आई-वडिलांना.
“अत्यंत कठीण परिस्थितीत आई-वडिलांनी केलेल्या त्यागामुळेच आज मी इथपर्यंत पोचलो. आता मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवणार,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाम शब्दांत सांगितले.
मातीचा मुलगा, संघर्षाची कहाणी आणि डोळ्यांत भरारी.
श्रीगोंद्याचा हा लेफ्ट हॅण्डर आता हैदराबादच्या मैदानावर नुसता खेळणार नाही… तर खेळात आपली सही उमटवणार आहे.
🔴🟢🟠🟣
