आष्टी महावितरणचा मनमानी कारभार; चार गावांतील नागरिक त्रस्त
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १८ एप्रिल २०२६
विश्व निर्माता | जालना प्रतिनिधी – हरिचंद्र वाघमारे
परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात महावितरणच्या निष्काळजी आणि मनमानी कारभारामुळे चार गावांतील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. रायगव्हाण, फुलवाडी, पळशी आणि आनंदगाव या गावांमध्ये १५ मार्चपासून वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कामावरून परतणाऱ्या महिलांना रात्रीच्या अंधारात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत आष्टी येथील अभियंता कुरेशी यांनी सांगितले की, “या चार गावांना सिंगल फेज लोड मिळत असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे कठीण होत आहे.” मात्र नागरिकांच्या मते, शेतकऱ्यांच्या मोटारी चालाव्यात म्हणून रात्री दोन फेज (टू-फेज) लाईन दिली जाते आणि पहाटे पुन्हा बंद केली जाते. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता किंवा स्थानिक अधिकारी – कोणाकडूनही ठोस उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. आष्टी सबस्टेशनचे फोनही अनेकदा बंद असतात, अशी तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात अपयश आल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. “आम्ही सण साजरा करायचा की अंधारात बसायचे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर समस्येकडे लवकरात लवकर लक्ष न दिल्यास चारही गावातील नागरिक आष्टी येथील एमएसईबी कार्यालयावर मोर्चा काढतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
🟣🔴🟢🟠
