डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा | दि. १० जुलै २०२६
प्रतिनिधी : बबन चव्हाण
डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी तसेच रुग्णालयांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
निवेदनात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम याची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी किंवा रुग्णालयांवर हल्ला करणाऱ्या, धमकी देणाऱ्या तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका असोसिएशनने मांडली आहे.
तसेच डॉक्टर व पोलीस प्रशासन यांच्यात अधिक चांगला समन्वय राहावा यासाठी अधिकृत संपर्क अधिकारी नियुक्त करावा. डॉक्टर संरक्षण कायद्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहनराव लबडे यांनी प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व रुग्णालयांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व कायदेशीर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही प्रशासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निवेदनावर डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. नेमिचंद निकम, डॉ. नितीन रसाळ, डॉ. सचिन पानसरे, डॉ सिंधनकर राजेंद्र डॉ यशवंत चव्हाण, डॉ. पांडुरंग दातीर, डॉ. विनोद काकडे, डॉ. अभिजीत तिवाटणे, डॉ. बाळासाहेब हराळ, डॉ. अजिंक्य गिरमकर तसेच महिला प्रतिनिधी डॉ. शुभांगी भापकर, डॉ. सुजाता भोसले, डॉ. वैशाली कोकाटे, डॉ. अश्विनी सोमवंशी, डॉ. वंदना कदम, डॉ. रोहिणी गवते, डॉ. भाग्यश्री ताकपेरे, डॉ. निकिता इथापे, डॉ. मनीषा कुताळ आणि डॉ. वृषाली लगड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
🟣🟠🟢🔴
