श्रीगोंद्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहाय्य साधन वितरणासाठी १ ऑगस्ट रोजी मुल्यमापन शिबिर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
३१ जुलै २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी
अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहाय्य साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीगोंद्यात मुल्यमापन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कम्युनिटी हॉल, पंतनगर, श्रीगोंदा नगरपरिषद येथे पार पडणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) यांच्या सहकार्याने, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड तसेच मासिक ₹२२,५०० किंवा वार्षिक ₹२.७० लाखांपर्यंतचे उत्पन्न दर्शविणारा उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. या योजनेचा मागील तीन वर्षांत लाभ घेतलेला नसावा. बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल व स्मार्टफोनसाठी मागील पाच वर्षांत लाभ घेतलेला नसावा.
शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना व्हीलचेअर, काठी, कुबडी, सी.पी. चेअर, श्रवणयंत्र, ब्रेल किट, स्मार्टफोन, सेन्सरयुक्त अंध काठी तसेच बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल आदी साहाय्य साधनांसाठी पात्रतेनुसार तपासणी करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचीही तपासणी केली जाणार आहे. यासाठी आधार कार्ड तसेच मासिक ₹१५,००० किंवा वार्षिक ₹१.८० लाखांपर्यंतचे उत्पन्न दर्शविणारा दाखला अथवा रेशन कार्ड आवश्यक राहील.
श्रीगोंदा तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी श्रीमती राणी फराटे यांनी केले आहे.
