“मला आर्थिक मदत नको, फक्त न्याय हवा” — वारकरी बाबांची भावनिक साद
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
३० जुलै २०२६
प्रतिनिधी : शिवाजी खोमणे
वारीदरम्यान समोर आलेल्या एका वारकरी बाबांची जीवनकहाणी राज्यभरातील नागरिकांच्या मनाला भिडली आहे. त्यांच्या मुलाखतीवर आधारित प्रसिद्ध झालेल्या पोस्टला साडेतीन हजारांहून अधिक लाईक्स, तसेच हजारो प्रतिक्रिया मिळाल्या असून समाजात आजही संवेदनशीलता, माणुसकी आणि न्यायाची भावना जिवंत असल्याचे त्यातून अधोरेखित झाले आहे.
आयुष्यभर कष्ट करून संसार उभा करणाऱ्या या वारकरी बाबांच्या आयुष्यात नियतीने अनेक कठोर आघात केले. पत्नी, मुलं आणि जवळची माणसं गमावल्यानंतर जमिनीचा वाद, नात्यातील विश्वासघात आणि एकाकीपणाचा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. या सर्व संकटांवर मात करत ते आजही न्यायाच्या आशेने उभे आहेत.
वारी संपल्यानंतर पत्रकार प्रियंका लाठी यांनी बाबांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली. घरात पोहोचताच बाबांनी हसतमुखाने, “दिदी… तुला चहा करून देतो,” असे म्हणत त्यांचे स्वागत केले. स्वतःच्या अडचणींमध्येही पाहुण्याचे आत्मीयतेने केलेले स्वागत उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.
या भेटीदरम्यान प्रियंका लाठी यांनी बाबांशी सविस्तर संवाद साधून त्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतली. जमिनीच्या वादात त्यांना न्याय मिळावा यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
संवादादरम्यान वारकरी बाबांनी अत्यंत ठाम शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. “मला कोणाचं काहीच नको… माऊलीने मला खूप काही दिलं आहे,” असे सांगत त्यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते, त्यांना केवळ त्यांच्या जमिनीच्या प्रकरणात न्याय मिळावा, हीच एकमेव अपेक्षा आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांना बाबांना आर्थिक मदत न पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी त्यांचा संघर्ष अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून संबंधित प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापक जनसमर्थनामुळे त्यांच्या न्यायाच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वारकरी परंपरेतील श्रद्धा, संयम आणि स्वाभिमान जपत न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळावे आणि विठुरायांच्या कृपेने वारकरी बाबांना न्याय लाभावा, अशीच सर्वसामान्यांकडून प्रार्थना व्यक्त केली जात आहे.
🔴🟢🟠🟣
