श्रीगोंद्यात पुन्हा गुटखा माफियांवर एलसीबीचा धडक कारवाई ; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
विश्व निर्माता न्यूज पोर्टल
श्रीगोंदा, 2 ऑगस्ट 2026
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाल्यानंतर मध्यरात्री धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३६ हजार ८२८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
३१ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा बसस्थानकाजवळील हॉटेल त्रिमूर्तीलगत असलेल्या बोळात एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. यावेळी शुभम कडोले (रा. बसस्टँड परिसर, श्रीगोंदा) याच्याकडे महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तेथून फरार झाला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २१६ पुडे सुगंधित तंबाखू (किंमत ४,७५२ रुपये) तसेच १,६६२ पुडे केसरयुक्त विमल पानमसाला (किंमत ३२,०७६ रुपये) असा एकूण ३६,८२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मधुकर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.
🟠🟡🔵🔴
