शिक्षकांच्या अभावाविरोधात विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन; गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच डबा खाऊन व्यक्त केला निषेध! शिक्षकांची नियुक्तीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, ८ जुलै २०२६
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
श्रीगोंदा : तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी व पालकांनी पंचायत समिती कार्यालय गाठले. यावेळी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांनी डबा खाऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की, शाळेत आवश्यक त्या संख्येने शिक्षक उपलब्ध नसल्याने नियमित अध्यापन होत नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणी येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक वेळा मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी करत गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
🟠🟡🔵🔴
