नागवडे कारखाना देणार उच्चांकी ३१५० रुपये ऊस दर
पहिला हप्ता ३००० रुपये तर दिवाळीला १५० रुपये
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १४ डिसेंबर २०२५
तालुका प्रतिनिधी: श्रीगोंदा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात उच्चांकी ३१५० रुपये प्र. मे. टन ऊस दर देणार असून त्यापैकी पहिला हप्ता रुपये ३००० प्र. मे. टन प्रमाणे देणार असून उर्वरित १५० रुपये दिवाळीला देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ५१ वा गळीत हंगाम चालू असून सभासद व उत्पादक शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार, ठेकेदार या सर्वांच्या सहकार्याने गाळप हंगाम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. आज अखेर कारखान्याचे दोन लाख ८२ हजार 303 मे. टन ऊस गाळप झाले असून सरासरी प्रतिदिन सात हजार मे.टन उसाचे गाळप होत आहे. कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी सातत्याने सभासद शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा घेऊन त्यांच्या नंतरही कारखान्यामार्फत सभासद शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नागवडे पुढे म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारी समोर अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करून नागवडे कारखाना प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. नागवडे कारखाना जिल्ह्यात ऊस भावामध्ये कधीही मागे राहिलेला नाही व भविष्यातही राहणार नाही. मागील गळीत हंगामात सभासद शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार तीन हजार पन्नास रुपये टनाप्रमाणे रक्कम पूर्णपणे अदा केलेली आहे. त्याचप्रमाणे चालू गळीत हंगामातही नागवडे कारखान्याने उच्चांकी ३१५० रुपये दर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला हप्ता रुपये 3000 प्र. मे. टणाप्रमाणे देणार असून उर्वरित १५० रुपये प्रमाणे पेमेंट दिवाळीला सभासद शेतकऱ्यांना आदा केले जाणार असल्याचे नागवडे यांनी म्हटले आहे.
नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, नागवडे सहकारी साखर कारखाना हि तालुक्याची सहकार गंगोत्री असून विकासाची मूळ मातृसंस्था आहे. या संस्थेच्या विकासात्मक वाटचालीमध्ये सभासद शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केलेले आहे आणि भविष्यातही निश्चितपणे करतील याचा विश्वास आहे. जेवढे जास्त गाळप होईल तेवढा संस्थेचा व सभासद शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्यामुळे किमान फेब्रुवारी मार्च अखेरपर्यंत सभासद शेतकऱ्यांनी थांबून आपला ऊस आपल्या कारखान्यास गळीत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते. नागवडे कारखान्याच्या उच्चांकी भावामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सभासद शेतकऱ्यांकडून संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे.
🔴🟢🟠🟣
