शिरूर–श्रीगोंदा सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार १५ डिसेंबर २०२५
जिल्हा प्रतिनिधी :शिरूर–श्रीगोंदा सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामातील निकृष्ट दर्जा, अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात मा. श्री.अनिल नामदेव बनकर यांनी देवदैठण येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. हे उपोषण गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ पासून सुरू असून प्रशासनाकडून अद्यापही ठोस व जबाबदार प्रतिसाद मिळालेला नाही.
उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकारी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देण्यास टाळाटाळ करत असून, केवळ ठेकेदारांशी संबंधित किंवा कॉन्ट्रॅक्ट विशेष अधिकारी पाठवून वेळकाढूपणा केला जात आहे. यामुळे ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या PQC (सिमेंट काँक्रेट) रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून खडी उघडी पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच HPC पुलांच्या कामात वापरण्यात आलेले पाईप हे मंजूर इस्टिमेटनुसार NP4 दर्जाचे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर त्रुटींकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या आंदोलनाला आता व्यापक पाठिंबा मिळू लागला असून ढवळगाव, निंबवीसह संबंधित ग्रामपंचायतींनी लेखी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच परिसरातील विविध तरुण मंडळांनीही उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
उपोषणकर्ते अनिल बनकर यांनी आपली भूमिका अधिक ठाम शब्दांत मांडताना सांगितले की,
“हे उपोषण कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व्हावे, यासाठीच मी हे पाऊल उचलले आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण योग्य ती कारवाई झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. यानंतर आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास त्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची असेल.”
दरम्यान, लवकरात लवकर प्रशासनाने दखल न घेतल्यास शिरूर–पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संतप्त ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घेऊन दोषी ठेकेदारावर कारवाई करावी व रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पुन्हा करण्यात यावे, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
🔴🟢🟠🟣
