तांदळी दुमाला येथे लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी
उपसरपंच राजेंद्र भोस यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे सहकार्य
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २३ जानेवारी २०२६
जिल्हा प्रतिनिधी:तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे मांडवगण जिल्हा परिषद गटातील टोकाचे गाव असून येथील शेतकरी व पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवेसाठी भानगाव येथील दवाखान्यात तब्बल १५ किलोमीटर अंतर कापावे लागत होते. तांदळी दुमाला अंतर्गत टाकळी लोणार व कोरोगव्हाण ही गावे येत असून या परिसरात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र वेळेवर पशुवैद्यकीय सेवा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते.
या पार्श्वभूमीवर तांदळी दुमाला येथे स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. उपसरपंच राजेंद्र भोस यांनी दि. ३० ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू केला.
या मागणीसाठी उपसरपंच भोस यांनी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र गांधी यांच्या निधनानंतर हे काम काही काळ रखडले.
यानंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या सहकार्याने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयात लक्ष घालून पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तांदळी दुमाला येथे लवकरच पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात येणार आहे.
या मंजुरीमुळे तांदळी दुमाला तसेच परिसरातील इतर गावांतील पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पशुधनाच्या उपचारासाठी लागणारा वेळ व खर्च वाचणार आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना निवेदन देताना युवा नेते प्रतापसिंह पाचपुते माजी उपसरपंच राजेंद्र भोस, माजी चेअरमन बापूसाहेब माजी सरपंच हौसराव बोरुडे, नामदेव धालवडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
