उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने तांदळी दुमाला गाव शोकसागरात
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार ३० जानेवारी २०२६
(दि. २८ जानेवारी २०२६)श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेचे वृत्त समजताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली असून, श्रीगोंदा शहरासह तांदळी दुमाला येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
अजित पवार यांच्या निधनाच्या निषेधार्थ व शोक व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवले. गावातील सर्व दुकाने बंद होती, शटर डाऊन होते आणि रस्त्यांवर शांतता पसरलेली दिसून आली.
…शोकसभा आयोजित…
तांदळेश्वर देवस्थान मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस मा. उपसरपंच राजेंद्र भोस,संचालक निलेश शेळके,हरिभाऊ धावडे,रावसाहेब भोस,संदीप घाडगे,अब्बास मुलानी,मा. सरपंच हौसराव बोरुडे,दगडू भोस,अप्पा धालवडे,मधुकर कुलकर्णी,लखन भोस,बाळू भोस,बाळू लांबडे,भिकाजी भोस,यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
….. गावकऱ्यांची भावना…..
तांदळी दुमाला येथील जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि जेष्ठ नागरिक अजित पवार यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झाले आहेत.“अजितदादा हे शिस्तप्रिय, कडक निर्णय घेणारे आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना तत्काळ न्याय देणारे नेते होते,” अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते.
गावातील अनेक नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू होते. “समाजाशी आपुलकी जपणारा, सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आपण गमावला,” अशी भावना सर्वत्र दिसून येत होती. शालेय विद्यार्थ्यांनीही शोक व्यक्त करत मौन पाळले.
…अपघाताची पार्श्वभूमी…
अजित पवार हे बारामती येथे नियोजित सभेसाठी जात असताना विमानाच्या लँडिंगदरम्यान हा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती मिळाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.तांदळी दुमाला ग्रामस्थांसाठी हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
🔴🟢🟠🟣
