उखलगाव येथे महिला दिनानिमित्त विशेष महिला ग्रामसभा उत्साहात संपन्न
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार,८ मार्च २०२६
तालुका प्रतिनिधी:–आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत उखलगाव व सर्व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात आणि महिलांच्या मोठ्या सहभागात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विलास पाटील लाकुडझोडे हे होते.
या ग्रामसभेत महिला सक्षमीकरण, बालविवाह रोखणे, हुंडा बंदी तसेच समाजातील जाचक प्रथा बंद करण्याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. समाजात महिलांची भूमिका अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षण, जागरूकता आणि संघटित प्रयत्नांची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. प्रा. सुप्रिया संग्राम पवार यांनी महिलांनी शिक्षण घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत नियमित व्यायाम करावा, विचार व्यापक व जागतिक ठेवावेत तसेच एकमेकांशी स्पर्धा न करता परस्पर सहकार्य व मैत्रीची भावना जपावी, असेही त्यांनी सांगितले. महिलांच्या एकतेमुळे समाजात मोठे परिवर्तन घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह गावातील अनेक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत उखलगाव व सर्व महिला बचत गटांच्या वतीने करण्यात आले.
🔴🟢🟠🟣
