UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १६ मे २०२६
या कालावधीत त्यांचे अनुदान पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत
मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, UDID कार्ड अनिवार्य केल्यानंतर अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान तांत्रिक कारणांमुळे थांबले होते. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने ही मुदतवाढ दिली आहे.
1 एप्रिल 2026 पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
15 जूनपर्यंत अर्ज करण्याचे निर्देश
शासनाने सर्व पात्र लाभार्थ्यांकडून 15 जून 2026 पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर UDID कार्डसाठी अर्ज करून घेण्याचे आदेश दिले आहेत. अर्ज क्रमांक SAS पोर्टलवर अद्ययावत करण्याचे तसेच आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
तहसीलदारांना विशेष समन्वयाची जबाबदारी
जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत UDID कार्ड मिळावे यासाठी तहसीलदारांना आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गावनिहाय लाभार्थी यादी प्रसिद्ध करून अपात्र किंवा बनावट लाभार्थी वगळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
प्रत्येक तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी शिबिरे
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांवर सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही या मोहिमेचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🟣🔴🟢🟠
