CM Devendra Fadnavis : मुंबई-पुण्यासोबतच अन्य शहरांमध्येही जीसीसीचा विस्तार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
१२ ऑगस्ट २०२६
पुणे – राज्यातील चारशे ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) केवळ मुंबई किंवा पुण्यात असण्याची गरज नाही. मुंबई आणि पुणे हे राज्याचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून कायम राहतील. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रतिभावान मनुष्यबळ उपलब्ध आहे.
नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य उदयोन्मुख शहरी केंद्रांमध्ये विशेषीकृत ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) विकसित केली जातील,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
जीसीसीप्रोज नेतृत्व शिखर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, जीसीसीप्रोजचे मुख्य सल्लागार निलेश देशमुख, शम्मी प्रभाकर आदी उपस्थित होते. ‘महाराष्ट्राला जीसीसी क्षेत्रात आघाडी मिळविण्यासाठी सर्वसमावेशक परिसंस्था राज्यात अगोदरच आहे.
मुंबईकडे देशातील सखोल वित्तीय व व्यावसायिक परिसंस्था आहे. पुण्याकडे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा मजबूत आधार आहे. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्येही जीसीसी विकसित करण्याची क्षमता आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, ‘देशातील जीसीसीच्या वाटचालीची सुरुवात कुशल मनुष्यबळ, कौशल्य आणि खर्चाच्या दृष्टीने कार्यक्षमतेच्या आधारे झाली. मात्र, आता या क्षेत्राचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आगामी काळात जीसीसी हे केवळ कार्यालयीन सहाय्यक कामकाजापुरती मर्यादित राहणार नाहीत. ती अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), उत्पादन विकास, सायबर सुरक्षा, वित्तीय सेवा, डेटा विश्लेषण तसेच संशोधन व विकासाची केंद्रे बनतील. या केंद्रांमधून जागतिक व्यवसायांचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील.’
पुणे देशाचे नेतृत्व करेल…
‘पुण्याने २०२५ मध्ये जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रातील आपली योग्यता सिद्ध केली आहे. २०२५ मध्ये पुणे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनले असून, मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. २०२६ च्या अखेरीस जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचे नेतृत्व करेल,’ असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यात चारशे नवीन जीसीसी, चार लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्याला देशातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा सरकारचा निर्धार आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
– भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळाची उपलब्धता साखळी निर्माण करणे आवश्यक
– कौशल्यांच्या निर्मितीसाठी सरकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रित येणे गरजेचे
– कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर राहायचे आहे
– उद्योगांना नियमित मंजुरीसाठी आठवडे किंवा महिने प्रतीक्षा करावी लागू नये
– जीसीसीसाठी एकच जबाबदार सरकारी संपर्क व्यवस्था निर्माण करण्यासाठी काम केले जाईल
– एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टात जीसीसीची महत्त्वपूर्ण भूमिका
