एका निर्घृण हत्येने नांदेड पुन्हा एकदा हादरले
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ६ एप्रिल २०२६
नांदेड प्रतिनिधी:नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात सोमवारी (ता.६) पहाटे घडलेल्या एका निर्घृण हत्येने नांदेड मधील रहिवाशी नागरिक पुन्हा एकदा हादरले आहे. शिवसेना युवा सेनेचे शहराध्यक्ष असलेले सोनू कल्याणकर यांची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी अनेक वेळा वार करत हत्या करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांत नांदेड शहरात पाठोपाठ पाच खून झाल्याने गँगवॉरचे भिती अधिक वाढू लागली असून, पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्यासह फेरफटका मारत होते. यावेळी श्रीनगरमधील पंचशील कापड दुकानाजवळ, कुमार ड्रेसेससमोर एक चारचाकी वाहन अचानक थांबले. त्यातून उतरलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारींच्या सहाय्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी सोनू कल्याणकर यांच्या मानेवर, पाठीवर आणि शरीराच्या अनेक भागांवर वेगाने वार करत त्यांना रक्तबंबाळ केले. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटना घडताच आरोपी वाहनातून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. दरम्यान, त्यांच्यावर यापूर्वीही गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या वेळी ते बचावले होते; मात्र यावेळी हल्लेखोरांनी थेट जीव घेतला. शहरात तीन दिवसांत घडलेल्या खुनांच्या मालिकेमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि अगदी रुग्णालय परिसरातही हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
झरीजवळ पोलिसांची कारवाई
पोलिसांनी सोनू कल्याणकर हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीस झरीजवळ पाठलाग करून ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईत संशयित जखमी झाला असून, त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
गँगवॉरचे वाढते सावट
नांदेडमध्ये अलीकडच्या काळात गुन्हेगारी टोळ्यांची पुन्हा एकदा सक्रियता वाढल्याचे चित्र दिसत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारे संघर्ष थेट जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत पोहोचत आहेत. तीन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली असून, संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
🟣🔴🟢🟠
