महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
१५ जुलै २०२६
श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. ग्रामीण भागातील हे महाविद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि विविध उपक्रमांमुळे आदर्श ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, भौतिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी उपक्रमशील शिक्षक डॉ. बापू देवकर यांनी विद्यार्थ्यांना आंब्याची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्रा. भोस सर यांनी भूगोल विषयात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकी ₹१,१०० रोख रक्कम देऊन गौरव केला. तसेच प्रा. सौ. उषा बोरुडे यांनी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तसेच भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार केला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या तसेच भविष्यात उभारण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यक्रमानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, डॉ. सुदाम भुजबळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप दरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. बापू मांडे यांनी केले.
🟣🟠🟢🔴
