जिल्हा बँक निवडणुकीच्या ठराव प्रक्रियेत आर्थिक व्यवहारांच्या चर्चांना उधाण सहकार विभागात खळबळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १६ जुलै २०२६
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातील ठराव मंजुरीची प्रक्रिया सध्या श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान ठराव मंजुरीसाठी आर्थिक तोडजोड होत असल्याच्या चर्चांनी सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
ठराव मंजुरीसाठी तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने कार्यालयात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काही ठरावांना प्राधान्य देणे, मंजुरीची प्रक्रिया वेगवान करण्याच्या बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चा सहकार क्षेत्रात जोर धरू लागल्या आहेत. या चर्चांमुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकारामुळे अनेक सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा आर्थिक देवाणघेवाण होणार नाही, याची खात्री करण्याची मागणी होत आहे. वरिष्ठ सहकार अधिकाऱ्यांनी या चर्चांची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सहकार क्षेत्रातून जोर धरत आहे.
दरम्यान, या चर्चांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या ठराव मंजुरी प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, आता वरिष्ठ सहकार प्रशासन या चर्चांची कितपत गंभीर दखल घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
🟣🟠🟢🔴
