श्रीगोंदा नगरपरिषद अर्थसंकल्पीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २६ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा माधव बनसुडे : – श्रीगोंदा नगरपरिषदेच्या २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत शिवसेनेच्या सर्व नऊ नगरसेवकांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी आणि विधायक भूमिका मांडत ऐतिहासिक पाऊल उचलले. गटनेते बाबूशेठ धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी विशेष तरतूद करण्यात आली. पारगाव रोड चौकातील स्मारकासाठी करण्यात आलेली निधीची मागणी सभागृहाने एकमताने मंजूर केली.
याचबरोबर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्याक समाजाच्या विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात ५ टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली. तसेच शेख महंमद बाबा देवस्थानच्या विकासासाठी १० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली. भैरवनाथ देवस्थान विकसित करण्यासाठी पर्यटन निधीतून तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली.
शहरातील दोन्ही कब्रस्तानमध्ये कर्मचारी नेमणूक व सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, ऐतिहासिक वारसा असलेल्या महादजी शिंदे इमारत, विजय वेस आणि दिल्ली वेस यांचे संवर्धन यांसाठीही खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
अँड. दिपाली बोरुडे, अनिल औटी, सौ. अनिता औटी, अँड. सुशीलकुमार शिंदे, ऋषिकेश (बंटी) बोरुडे, सौ. पल्लवी पोटे व श्रीमती भामाबाई कोथिंबीरे यांनी सुचवलेल्या रस्ते, ड्रेनेज, शाळा परिसर सुशोभीकरण आणि सामाजिक सभागृहांच्या मागण्यांना नगराध्यक्षा श्रीमती सुनिताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष सौ. अलकाताई दरेकर/अनभुले तसेच मुख्याधिकारी श्रीमती पुष्पगंधा भगत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली.
लेखापालांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच अर्थसंकल्पात शहराच्या महत्त्वाकांक्षी गरजा प्रभावीपणे मांडल्या. प्रशासन आणि सर्व नगरसेवकांच्या अभूतपूर्व समन्वयातून साकार झालेला हा विकासाभिमुख अर्थसंकल्प श्रीगोंदा शहराच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरणार आहे.
🔴🟢🟠🟣
