हॉटेल मालकांनो सावधान! ग्राहकांना पिण्याचे मोफत पाणी नाकारले तर कारवाई अटळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 25 जून 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
राज्यभर सुरू असलेल्या “सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र” मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हॉटेल, रेस्टॉरंट व खाद्य व्यवसायिकांना कडक इशारा दिला आहे. ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, बिसलरी किंवा पॅकेज्ड पाणी खरेदी करण्याची सक्ती केल्यास संबंधित व्यावसायिकांवर कारवाई होऊ शकते.
FDA च्या सूचनांनुसार हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मोफत देणे आवश्यक आहे. केवळ बाटलीबंद पाणी विक्रीसाठी ठेवून ग्राहकांना तेच घेण्यास भाग पाडणे हा ग्राहकांच्या अधिकारांचा भंग मानला जाऊ शकतो.
याशिवाय हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे, शाकाहारी व मांसाहारी अन्न वेगवेगळे साठवणे, कीटक नियंत्रण करणे, पुरेशी हवा खेळती राहील याची व्यवस्था करणे तसेच ग्राहकांसाठी स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे हॉटेल व खाद्य व्यवसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
🟠🔵🔴🟡
