लोणी व्यंकनाथ शेततळे दुर्घटना प्रकरणाला नवे वळण
टिळक भोस, सिमतल वाबळे यांच्यासह १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 25 जुलै 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे २३ जुलै रोजी शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर झालेल्या आंदोलनाप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, सिमतल वाबळे यांच्यासह एकूण १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैला महेंद्र डांगे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेततळ्यात पडलेल्या दोन चिमुकल्या मुलींना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी लोणी व्यंकनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले होते. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.
या आंदोलनादरम्यान सरकारी आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामकाज करण्यास अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैला डांगे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीच्या आधारे श्रीगोंदा पोलिसांनी टिळक भोस, सिमतल वाबळे व इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७९, १२१(२), २२१, ३५१(२) आणि ३५२ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियम, २०१० मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “लोणी व्यंकनाथ येथील दोन निष्पाप मुलींच्या मृत्यूस डॉ. प्रशांत मुळे आणि डॉ. शैला डांगे जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी लवकरच आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.”
याशिवाय श्रीगोंदा तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत, तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणामुळे तालुक्यात राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख करीत आहेत.
🟠🔵🟡🔴
