शेततळ्यात पडलेल्या दोन चिमुकल्यांचा रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला चार तास ठोकले टाळे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 24 जुलै 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. आनंदी अनिल कांबळे (वय ४) आणि वीरा प्रविण कांबळे (वय ३) अशी मृत बालिकांची नावे असून, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी लोणी व्यंकनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकत सुमारे चार तास आंदोलन केले. संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. सुरुवातीला आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, अधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामस्थांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.
घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडे, तालुका आरोग्य अधिकारी शैला डांगे, पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर , तहसीलदार सचिन डोंगरे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून योग्य चौकशी व दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडे यांनी सांगितले की, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याप्रकरणी सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असून, चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या घटनेमुळे ग्रामीण भागातील आपत्कालीन आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🟠🟡🔵🔴
