राजे छत्रपतींचे विजयी किल्ले ढासळत; महाराष्ट्राच्या वैभवाच्या संवर्धनाची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
दि. १३ जुलै २०२६
महाराष्ट्र |
महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले भुईकोट किल्ले तसेच राज्यातील इतर पुरातन किल्ले सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून त्यांच्या तातडीने संवर्धन व दुरुस्तीची आवश्यकता असल्याची मागणी पर्यटकप्रेमींनी केली आहे. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे ऐतिहासिक किल्ले ढासळत असल्याने राज्याच्या सांस्कृतिक वैभवाला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पर्यटनस्थळांवर स्वच्छता, रंगकाम, तटबंदी व भिंतींची दुरुस्ती, शिल्पांचे जतन, माहिती फलकांचे नूतनीकरण आणि परिसरातील नद्या व जलस्रोतांची स्वच्छता यासाठी राज्य शासनाने तातडीने निविदा (टेंडर) प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनेक पर्यटनस्थळांवर प्लास्टिकच्या बाटल्या, तंबाखू व गुटख्याच्या थुंकीमुळे परिसर अस्वच्छ झालेला दिसतो. काही ठिकाणी जुन्या भिंती, कमानी व छत जीर्ण होऊन कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक अशा ठिकाणी जाणे टाळत असल्याचेही पर्यटकप्रेमींचे म्हणणे आहे.
तसेच अनेक किल्ल्यांवरील माहिती फलक पुसट झाल्याने पर्यटकांना त्या ठिकाणचा इतिहास व महत्त्वाची माहिती समजण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि आवश्यक देखभाल यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
राज्यातील ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी मंजूर निधीचा प्रभावी वापर करून दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. विशेषतः मुसळधार पावसामुळे किल्ल्यांचे अधिक नुकसान होत असल्याने शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संवर्धनाची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, अशी अपेक्षा पर्यटकप्रेमींनी व्यक्त केली आहे.
🟣🟠🟢🔴
