विना नंबर प्लेट वाहनधारकांवर श्रीगोंदा पोलिसांचा दणका; चार दिवसांत १८७ वाहनांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 20 जून 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
चोरीच्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा पोलिसांनी विना नंबर प्लेट आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अवघ्या चार दिवसांत तब्बल १८७ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ३ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत काही जण चोरीच्या दुचाकींवरील नंबर प्लेट काढून त्यांचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १७ जून ते २० जून २०२६ या कालावधीत श्रीगोंदा शहर व पोलीस ठाणे हद्दीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. विना नंबर प्लेट फिरणाऱ्या दुचाकी वाहनांची तपासणी करून ती पोलीस ठाण्यात आणण्यात आली. वाहनांचे आरसी बुक, चेसीस नंबर, इंजिन नंबर आणि मालकी हक्काची पडताळणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान कागदपत्रांची पूर्तता करून वाहनांवर तात्काळ नंबर प्लेट बसविणाऱ्या १६९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ती सोडून देण्यात आली, तर आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या १८ वाहनांना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
– १७ जून २०२६ : ५६ वाहनांवर कारवाई; १ लाख ८ हजार ५०० रुपये दंड
– १८ जून २०२६ : ४७ वाहनांवर कारवाई; १ लाख १० हजार रुपये दंड
– १९ जून २०२६ : ५४ वाहनांवर कारवाई; १ लाख २ हजार रुपये दंड
– २० जून २०२६ : ३० वाहनांवर कारवाई; ३० हजार रुपये दंड
अशा प्रकारे चार दिवसांत एकूण १८७ वाहनांवर कारवाई करत ३ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
श्रीगोंदा शहर व पोलीस ठाणे हद्दीतील सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांच्या पुढील व मागील बाजूस नियमानुसार नंबर प्लेट बसवाव्यात. तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा श्रीगोंदा पोलिसांनी दिला आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोहेकॉ. अभय काळे, पोकाॅ. आजिनाथ जाधव, पोकाॅ. गोरख जाधव तसेच होमगार्ड यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
🔵🟠🟡🔴
