“श्रीगोंद्याला विकासाचा शब्द — २३-० चे लक्ष्य घेऊन भाजपा प्रचाराला सुरुवात”
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २७ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा (प्रतिनिधी) –ऋषिकेश साळवे :श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य शक्तीप्रदर्शन करत प्रचाराची सुरुवात करण्यात आली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या उपस्थितीत सुफी संत शेख महंमद बाबा दर्ग्यात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. शहरातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✔ शांतता व सामाजिक सलोखा जपण्याची भूमिका –
प्रचार सभेत बोलताना आमदार पाचपुते यांनी शहरात शांतता-सौहार्द टिकवण्यासाठी प्रशासन आणि जनतेने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, काही प्रसंगी बाहेरील लोकांकडून वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र शहरातील सुज्ञ नागरिकांनी एकजुटीने शांतता टिकवली.
✔ “विकासासाठी पुन्हा पूर्ण बहुमताची गरज” — यावेळी आमदार पाचपुते म्हणाले —
“श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर यावेळी एकसंध बहुमत देण्याची वेळ आली आहे. जनतेने आम्हाला संधी दिल्यास विकास म्हणजे काय असतो ते प्रत्यक्ष अनुभवाल.”
शहराच्या विकासाशी संबंधित प्रलंबित कामांबाबतही त्यांनी माहिती दिली. शंभर टक्के शास्ती माफीसंदर्भातील फाईल अंतिम टप्प्यात असून आचारसंहितेमुळे निर्णय काही दिवसांसाठी थांबला असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले.
✔ नगरपरिषदेच्या मूलभूत सुविधा व प्रलंबित प्रकल्पांवर चर्चा –
शहरातील रस्ते, भुयारी गटार, पाणीपुरवठा व इतर सुविधा याबाबत भाजपच्या उमेदवारांनी आगामी नियोजन नागरिकांसमोर मांडले.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत नगरपरिषदेच्या आवश्यक प्रकल्पांसाठी निधीला हिरवा कंदील मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
✔ “जाती-धर्मावर नाही, विकासावर मत द्या” — संदेश –
सभा शांत, संतुलित वातावरणात झाली.
आमदार पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्याने अनेकदा सौहार्द राखून एक आदर्श निर्माण केल्याचे सांगून मतदान विकासाच्या मुद्द्यांवर व्हावे, अशी विनंती केली.
✔ माजी मंत्री बबनराव ( दादा ) पाचपुते यांचे मार्गदर्शन –
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सांगितले की, मागील काळात शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. भविष्यातही आवश्यक त्या सर्व कामांसाठी निधी आणण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
