शाळा परिसरातील टवाळखोरांवर श्रीगोंदा पोलिसांचा वचक; दोन युवकांवर कारवाई
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 1 जुलै 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीगोंदा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या आणि विनाकारण वावर करणाऱ्या युवकांविरोधात बुधवारी (दि. १ जुलै) विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही युवक दुचाकींवरून शाळा परिसरात वारंवार फेऱ्या मारत असल्याच्या तसेच मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, सायलेन्सरमध्ये बदल करून ध्वनीप्रदूषण करणे आणि विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने कारवाईचे नियोजन केले.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. साध्या वेशातील महिला पोलीस व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळा व महाविद्यालय परिसरात सकाळी आणि दुपारी विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याच्या वेळेत गस्त वाढवून सापळा रचण्यात आला.
या मोहिमेदरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पदरीत्या थांबलेल्या युवकांची चौकशी करण्यात आली. तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या व सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत काही वाहने जप्त करण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
संबंधित युवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची टवाळखोरी, छेडछाड किंवा सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणारे प्रकार आढळल्यास न्यायालयीन पातळीवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. शाळा किंवा महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढणे, विनाकारण घुटमळणे अथवा गोंधळ घालणे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा प्रकारांची माहिती नागरिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा ‘११२’ हेल्पलाइनवर द्यावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.”
🟠🔵🟡🔴
