श्रीगोंद्यात डीजेवाल्यांवर पोलिसांचा ‘स्ट्राईक’; विनापरवानगी साऊंड सिस्टीम जप्त, आयोजकांसह चालकांवर गुन्हे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 3 जुलै 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
ध्वनी प्रदूषणाविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत विनापरवानगी डीजे वाजवणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या चालक व आयोजकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित डीजे साऊंड सिस्टीम आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांत पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. या वेळी रात्री १० नंतरही मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे तसेच आवश्यक पोलीस परवानगीशिवाय साऊंड सिस्टीमचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित डीजे संच जागेवरच जप्त केले.
संबंधित चालक आणि आयोजकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील लागू कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच नियमबाह्य पद्धतीने मोडिफाय केलेल्या डीजे वाहनांबाबत पुढील कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) अहवाल पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कर्णकर्कश डीजेच्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि आवश्यक असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याची रीतसर परवानगी घेऊनच पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नियमभंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांनी कायद्याचे पालन करून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
🟠🔵🟡🔴
