💥अखेर बहुजन समता पार्टीमुळे सहा महिन्यानंतर वृद्ध आई-वडील व बहिणीस न्याय 💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २६ जानेवारी २०२६
कर्जत (प्रतिनिधी):➡️
कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक येथील प्रदीप नामदेव पठाडे यांनी दिनांक 29 जून 2025 रोजी घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमागे सात जणांनी प्रदीपला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याची बहीण रोहिणी दत्तु थोरात, आई संगीता नामदेव पठाडे (वय 72) व वडील नामदेव कोंडीबा पठाडे (वय 75) यांनी केला आहे.
या प्रकरणी पीडित कुटुंबीयांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी दाखल केल्या. मात्र राजकीय दबावामुळे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. न्याय मिळावा यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याच्या अनेक फेऱ्या मारल्या, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणही केले, तरीही तब्बल सहा महिने गुन्हा दाखल झाला नव्हता.
अखेर पीडित कुटुंबीयांनी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांची भेट घेतली. त्यांनी नगर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड, कर्जत महिला तालुकाध्यक्ष अलका जगधणे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य महादेव डाडर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य परशुराम डाडर, कर्जत तालुका उपाध्यक्ष गणेश केंदळे, बाळू अरणे यांच्या सहकार्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
पीडित कुटुंबीयांनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देत तशी लेखी नोटीस दिल्यानंतर प्रशासन हालचालीत आले. वसंतराव सकट यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याशी सखोल चर्चा केली. त्यानंतर एपीआय विजय झंजाड यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
अखेर मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0028/2026 दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी शिवाजी खोमणे, अंकुश खोमणे, सोमनाथ खोमणे, नामदेव लांबटुळे, दिव्या कांबळे, सावता कांबळे व तुकाराम माने यांच्याविरोधात BNS 108, 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सहा महिन्यानंतर अखेर गुन्हा दाखल झाल्याने वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसत होते. या प्रकरणी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ धार्गे, उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांचे आभार मानले तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
🔴🟢🟠🟣
