मतदानापुरतेच आमदारांचे दर्शन, हातोळण ग्रामस्थांचे हाल – रस्त्याविना विकास ठप्प
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६
मुख्य संपादक:– श्रीगोंदा तालुक्यातील हातोळण गावाकडे लोकप्रतिनिधी केवळ मतदानाच्या वेळीच फिरकतात, निवडणुकीनंतर मात्र गावाकडे पुन्हा वळूनही पाहिले जात नाही, अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गेले तीन पंचवार्षिक तालुक्यात आमदार बदलत असले तरी हातोळण गावाच्या मूलभूत समस्यांकडे कोणत्याही आमदाराने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.
पूर्वी माननीय बाबाराव पाचपुते आमदार असताना मांडोगण फाटा ते हातोळण देवी रस्त्यासाठी निधी देऊन डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आज त्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून डांबर उखडून दगड, गोटे व मुरूमच उरले आहेत. या खराब रस्त्यावरून ग्रामस्थ व भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
हातोळणकडे जाणारा मार्ग जंगलातून जात असल्याने रात्रीच्या वेळी ये-जा करणे अधिक धोकादायक ठरत आहे. जवळच सोलापूर-नगर महामार्ग असूनही अवघ्या ४ किलोमीटर अंतरासाठी ग्रामस्थांना दगड-मातीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जाऊन परत येताना मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत.
हातोळण गावात देवी रेणुका मंदिर असून परिसरातील १० ते १५ गावांमधून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात सुमारे १२०० ते १४५० मतदार असून प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रासाठी शासकीय कर्मचारी येतात, मात्र विकासकामांसाठी निधी मिळत नाही, ही ग्रामस्थांची मुख्य तक्रार आहे.
“आमदार मत मागायला येतात, पण गावाकडे येणारा रस्ता मात्र गेले अनेक वर्षे धुळ खात पडून आहे. तीन पंचवार्षिक झाले तरी विकासाचा एकही ठोस प्रकल्प मंजूर झाला नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
देवीच्या भूमीत विकासाला मुकावे लागत असल्याने हातोळणचे भाविक व ग्रामस्थ निराश असून लवकरात लवकर रस्त्यासाठी निधी मंजूर करून काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी आता होत आहे.
🔴🟢🟠🟣
