श्रीगोंदा येथील चर्च ऑफ ख्राईस्ट, श्रीगोंदाचा १११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २२ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी :-श्रीगोंदा शहराच्या धार्मिक व सामाजिक जीवनात मोलाचे स्थान असलेल्या चर्च ऑफ ख्राईस्ट, श्रीगोंदाचा १११ वा वर्धापन दिन रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पश्चिम भारतातील या ऐतिहासिक चर्चने १११ वर्षांची प्रदीर्घ परंपरा पूर्ण केल्याच्या निमित्ताने दोन दिवस विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी उपस्थित राहून ख्रिस्ती महिला व बांधवांना शुभेच्छा दिल्या. पास्टर तिवारी यांच्यासह दौंड, बारामती, पुणे, अहिल्यानगर व वडाळा येथील महिला मंडळ तसेच श्रीगोंदा येथील तरुण संघ महिला मंडळ यांनी स्तुतीगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले.
वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी विशेष प्रार्थना सभेने कार्यक्रमांची सुरुवात झाली. रविवारी सकाळी मुख्य आराधना सभेत स्तुती-गीते, सामूहिक प्रार्थना व पवित्र वचन वाचन करण्यात आले. चर्च परिसर आकर्षक सजावटीने नटविण्यात आला होता. श्रद्धाळूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत होता.
या सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील अनिल बनसोडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी संदेशातून विश्वास, प्रेम, सेवा आणि समाजातील ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. १११ वर्षांची परंपरा ही केवळ काल गणना नसून श्रद्धा, त्याग आणि सेवाभाव यांची साक्ष असल्याचे सांगत त्यांनी चर्चच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात पैठण येथील चांदणे ब्रदर अँड फॅमिली यांच्या वतीने भक्तीमय भजन सादर करण्यात आले. स्तुती-गीतांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. भजन कार्यक्रमाचे नियोजन संजय रामफळे आणि पिटर रणशिंग यांनी उत्तमरीत्या केले.
चर्च सेक्रेटरी प्रकाश रणसिंग यांनी मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत करत चर्चच्या १११ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. या कालावधीत चर्चने आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच शिक्षण, समाजसेवा, गरजूंची मदत तसेच सामाजिक ऐक्य जपण्यासाठी सातत्याने कार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला परिसरातील ख्रिस्ती बांधव, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत वर्धापन दिनाचा आनंद साजरा केला. १११ वर्षांची समृद्ध परंपरा जपत पुढील काळातही समाजकार्य, आध्यात्मिक उन्नती आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात हा ऐतिहासिक वर्धापन दिन सोहळा यशस्वीपणे पार पडला.
🔴🟢🟠🟣
