वीज पुरवठा व ५४८-डी राष्ट्रीय महामार्ग कामे रखडल्याने आढळगावत सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचे आमरण उपोषण सुरू
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २३ फेब्रुवारी २०२६
💥वीज पुरवठा, ५४८ D राष्ट्रीय महामार्ग व रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत; अन्यथा उपोषण मागे घेणार नाही.💥
श्रीगोंदा प्रतिनिधी:श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे विद्यमान सरपंच शिवप्रसाद भाऊसाहेब उबाळे यांनी ग्रामस्थांसह आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. मौजे आढळगाव येथील सतत खंडित होणारा वीज पुरवठा, रखडलेले ५४८ D राष्ट्रीय महामार्गाचे काम तसेच इतर अपूर्ण विकासकामांच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आढळगावमध्ये विद्यार्थी व शेतकरी वर्गातून तीव्र आक्रोश
गेल्या अनेक दिवसांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू असून शेतकरी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजेअभावी पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांचा प्रपंच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी स्टार्टर सुरू करतात, मात्र वीज पुरवठा शेतापर्यंत सुरळीत पोहोचत नसल्याची गंभीर समस्या त्यांनी मांडली आहे.
अपूर्ण कामे वाहतूक आणि अपघाताचे मुख्य कारण बनले
दरम्यान, आढळगाव येथील ५४८ D राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून वारंवार अपघात घडत आहेत. अपूर्ण कामांमुळे काहींना जीव गमवावा लागल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. आढळगाव एस.टी. स्टॅण्ड परिसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर गतिरोधक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गटार लाईन, पथदिवे, रस्ता दुभाजक आदी कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधिकारी व ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे प्रकल्प रखडला सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचा रोष
तांदळी सबस्टेशन येथे मंजूर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून रखडले असून अधिकारी व ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे प्रकल्प पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास आढळगाव परिसरातील विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असे सरपंच उबाळे यांनी नमूद केले.
या उपोषणास मा. सेवा संस्थेचे चेअरमन दत्तात्रय चव्हाण यांनीही पाठिंबा दर्शविला. त्यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली.
प्रशासनाने आठ दिवसांत वीज व रस्त्याचा प्रश्न न सोडवल्यास सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आढळगाव एस.टी. स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओटा येथे ग्रामस्थांसह आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज उपोषणास सुरुवात झाली असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपोषणास सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अण्णा वाकडे, माजी सभापती विलासराव भैलुमे, सत्यवान शिंदे, धनंजय सूर्यवंशी, चंदू तांबुळी, राम भालेराव, बबन आबा काळे आणि सर्व आढळगावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
🔴🟢🟠🟣
