तांदळी दुमाला येथे शासकीय उप जिल्हा आरोग्य केंद्र होण्याबाबत माजी उप सरपंच राजेंद्र भोस यांची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २६ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना राज्यभर ‘कै. बाळासाहेब ठाकरे’ यांच्या नावाने दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला (लोकसंख्या सुमारे ४०००) येथे अद्याप कोणतीही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तांदळी दुमाला येथे जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व अंगणवाडी केंद्र असून दरवर्षी सुमारे सहा महिने ऊसतोड मजूर टोळ्यांचे वास्तव्य असते. एवढी लोकसंख्या आणि स्थलांतरित मजुरांची उपस्थिती असूनही गावात एकही खाजगी किंवा शासकीय दवाखाना नाही. जवळपासही आरोग्य सुविधा नसल्याने आपत्कालीन प्रसंगी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे तांदळी दुमाला येथील माजी उपसरपंच राजेंद्र भोस यांनी संबंधितांकडे निवेदन देऊन गावात तातडीने दवाखाना सुरू करण्याची मागणी केली आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीगोंदा आमदार विक्रमसिंह पाचपुते, अहिल्यानगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिक्षक, जिल्हाधिकारी (अहिल्यानगर), विभागीय आयुक्त (नाशिक), राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व आरोग्य मंत्री तसेच संबंधित प्रधान सचिव यांना देण्यात आले आहे.
गावातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ऊसतोड मजूर यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तांदळी दुमाला येथे ‘कै. बाळासाहेब ठाकरे’ यांच्या नावाने दवाखाना सुरू करावा, अशी ठाम मागणी माजी उपसरपंच राजेंद्र भोस यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
🔴🟢🟠🟣
