संत शेख महंमद महाराज यात्रेत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे कार्य कौतुकास्पद
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ९ मार्च २०२६
श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यात्रेनिमित्त पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि दिलेल्या कडेकोट सुरक्षेमुळे यंदाची यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यात्रेदरम्यान नागरिक व प्रशासनाकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
यात्रेच्या काळात श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यात्रेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. यात्रेकरू, भाविक तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेकडेही पोलिसांनी विशेष लक्ष दिले. खेळण्यांच्या स्टॉलपासून ते दर्शन रांगांपर्यंत सर्वत्र पोलिसांची सतर्कता दिसून आली.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धक्का-बुक्की होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना सन्मानपूर्वक आणि शांततेत दर्शन घेता आले. संपूर्ण यात्रा आनंदात पार पडली असली तरी ती पोलिसांच्या सजग आणि काटेकोर नियोजनामुळे सुरळीत पार पडल्याचे नागरिकांनी नमूद केले.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, सेवकरी, तसेच नगरपरिषद पदाधिकारी यांनीही कायद्याचे पालन करत सहकार्य केले. कोणताही राजकीय पक्षभेद किंवा जातीभेद न ठेवता सर्व भाविकांना रांगेत उभे करून समान पद्धतीने दर्शन देण्यात आले. यामुळे सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचेही दर्शन घडल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर संत शेख महंमद महाराज संस्थान समिती तसेच स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि श्रीगोंदा पोलीस पथकाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही सांगितले की, भविष्यातही संत शेख महंमद महाराज यात्रेदरम्यान नागरिकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करून भाविकांना आदरपूर्वक दर्शन घडविण्याचे कार्य पोलिसांकडून कायम सुरू राहील.
🔴🟢🟠🟣
