Maharashtra Solar Scheme : फक्त 2,500 रुपयांत सोलर; घरचं वीज बिल शून्य करणारी राज्य सरकारची स्मार्ट योजना काय आहे?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ३० जून २०२६
मुबई : वीज बिलामुळे महिन्याचं बजेट बिघडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारने अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना अवघ्या २,५०० रुपयांत घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवता येणार आहे.
एकदा सोलर बसवल्यानंतर वीज बिल जवळपास शून्यावर आणता येईल. शिवाय, अतिरिक्त वीज महावितरणला विकून कमाईची संधीही मिळणार आहे. महावितरणकडून ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट)’ योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’सोबत राज्य सरकारचे अतिरिक्त अनुदान मिळत असल्याने सोलर बसवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
२,५०० रुपये कसे?
एक किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प बसवण्यासाठी साधारण ५० हजार रुपये खर्च येतो. केंद्र सरकारकडून ३० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून आणखी १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे स्वतःच्या खिशातून केवळ २,५०० रुपये भरावे लागतील.
इतरांनाही मिळणार मोठा लाभ
अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना ३० टक्के अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे. तर इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील ग्राहकांना २० टक्के अतिरिक्त मदत मिळेल. त्यामुळे त्यांनाही ५ ते १० हजार रुपयांत सोलर प्रकल्प बसवणे शक्य होणार आहे.
नागपूर-वर्ध्यात लाखो ग्राहक पात्र
महावितरणच्या माहितीनुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार ७९६ ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. त्यापैकी नागपूरमधील २ लाख ७३ हजार ५०८ आणि वर्ध्यातील १ लाख ६ हजार ३३८ ग्राहकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १६ हजारांहून अधिक ग्राहकांना लाभ दिला जाणार आहे.
कोण करु शकतो अर्ज?
घरगुती वीज ग्राहक असणे आवश्यक
घरावर सोलर बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी
वैध वीज जोडणी असावी
यापूर्वी कोणत्याही सौर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा
मासिक सरासरी वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असावा
कुठे करायचा अर्ज?
पात्र ग्राहकांनी राष्ट्रीय सौर पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर योजना राबवली जाणार असल्याने शक्य तितक्या लवकर अर्ज करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. योजनेतील सोलर मॉड्यूल्स भारतीय बनावटीचे आणि प्रमाणित असतील. तसेच ग्राहकांना पाच वर्षांची मोफत देखभाल आणि दुरुस्तीची सुविधाही मिळणार आहे.
🟣🟠🟢🔴
