विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सहाजणांवर गुन्हा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार, १२ एप्रिल २०२६
विश्व निर्माता | प्रतिनिधी
अहिल्यानगर : हॉटेल व्यवसायासाठी माहेरहून ११ लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —मुदस्सर अस्लम मालजप्ते (पती), हमीदा अस्लम मालजप्ते (सर्व रा. वडळी रोड, आयआयटी कॉलेजसमोर, श्रीगोंदा), तसेच आसमा मुदस्सर शेख व नंदावा मुदस्सर शेख (दोघे रा. कुंभार गल्ली, दौंड, जि. पुणे).
याबाबत जस्मिन मुदस्सर मालजप्ते (वय ३३, मूळ रा. श्रीगोंदा, सध्या रा. कादरी मशिदीजवळ, मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सन २०१७ मध्ये मुस्लिम रिवाजानुसार विवाह झाल्यानंतर २०२४ पर्यंत संसार सुरळीत चालू होता. मात्र, त्यानंतर पतीने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून ११ लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासोबतच फर्निचर व इतर वस्तूंचीही मागणी करण्यात आली.
मागणी पूर्ण न केल्याने सासरकडील मंडळींनी विवाहितेचा छळ सुरू केला. तिला वारंवार शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला गेला. शिवाय, जीवे मारण्याची धमकी देत तिला घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या तक्रारीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
🟣🔴🟢🟠
