नाशिक आयटी कंपनी प्रकरण : पुण्याच्या महिला मॅनेजरला बेड्या, ५ संशयित जेलमध्ये
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार १० एप्रिल २०२६
विश्व निर्माता न्यूज: नाशिक – शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचार, विनयभंग, धर्मांतर प्रकरणात कंपनीच्या पुण्यातील मनुष्यबळ विभागातील संशयित महिला व्यवस्थापिकेला चौकशीअंती पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर यापूर्वी अटक केलेल्या पाच संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराचा प्रयत्न आदी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. लैंगिकदृष्ट्या जवळीक साधण्यासाठी लज्जास्पद वर्तन, पीडितांना स्पर्श करणे, वैवाहिक आयुष्याविषयी, वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबाबत बोलणे, बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावणे, शरीरावरून अश्लील शेरेबाजी यासह एका युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न आदी तक्रारींवरून आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत
या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने कंपनीच्या पुणे येथील मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख महिला व्यवस्थापिकेला ताब्यात घेतले होते. पीडित महिलेने कंपनीत घडणाऱ्या गैरप्रकारांबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु, त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संशयितांच्या गैरकृत्याला चिथावणी मिळाली. या अनुषंगाने चौकशी करून संशयित महिला व्यवस्थापिकेला अटक करण्यात आली.
अनुसूचित जमाती कल्याण समितीचा शिक्षण विभागाला दणका
या प्रकरणातील पाच संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आली. त्यांच्यासह महिला व्यवस्थापिकेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयित व्यवस्थापिकेला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर अन्य पाच संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातील सहा संशयित न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अन्य गुन्ह्यात वर्ग करून घेतले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. पीडितांनी निर्भीडपणे पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आसपासच्या कंपन्यांमध्येही चौकशी
या गंभीर बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून मुंबईहून पथक दाखल झाले आहे. या कंपनीच्या आसपास तशाच कंपन्या असून तिथेही असे प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी सूचनाही करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
🟣🔴🟢🟠
