किल्ले बनवा महास्पर्धा (ऑनलाईन) : उत्कृष्ट किल्ला बनविणाऱ्यांना प्रतापसिंह पाचपुते यांच्याकडून बक्षीस वितरण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २५ जानेवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी :
दीपावलीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्यासाठी व नव्या पिढीमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘किल्ले बनवा महास्पर्धा (ऑनलाईन)’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यासह परिसरातील अनेक मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून सुंदर व आकर्षक किल्ले उभारले.
स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी घरच्या घरी तयार केलेल्या किल्ल्यांचे फोटो व व्हिडिओ ऑनलाईन स्वरूपात पाठवले होते. यामधून उत्कृष्ट किल्ले बनविणाऱ्या स्पर्धकांना प्रथम चार क्रमांकांची रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, उर्वरित सहभागी मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तब्बल ४० प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. ही बक्षिसे पेडगाव व इतर गावांमध्ये गाडी पाठवून घरपोच देण्यात आली.
ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील श्रीगोंदा आमदार विक्रमसिंह पाचपुते ,ॲड. प्रतापसिंह बबनराव पाचपुते, – परिक्रमा शैक्षणिक संकुल, काष्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. शिवरायांच्या पराक्रमाची, त्यांच्या लढायांची व राज्यकारभाराची माहिती मुलांना प्रत्यक्ष कृतीतून मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेमुळे मुलांमध्ये इतिहास अभ्यासाची आवड निर्माण झाली असून किल्ले बांधकामाची रचना, वास्तुकला आणि पुरातन काळातील तंत्रज्ञान याबाबतही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. बक्षीस मिळाल्यानंतर पुढील वर्षीही अधिक उत्साहाने सहभागी होण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
बक्षिसांची यादी :
प्रथम बक्षीस – ₹ ११,०००/-
द्वितीय बक्षीस – ₹ ९,९९९/-
तृतीय बक्षीस – ₹ ७,७७७/-
चतुर्थ बक्षीस – ₹ ५,५५५/-
पाचवे बक्षीस – ₹ ३,३३३/-
शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राचा श्वास मानत अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, शौर्य व राष्ट्रभक्तीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहेत, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
🔴🟢🟠🟣
