कुकडी डावा कालवा चारी क्र. १३ फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. फार मोठी जीवित हानी टळली , शेतकरी दुखी
संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करा – वसंतराव सकट.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २४ जानेवारी २०२६
कुकडी डावा कालवा अंतर्गत येणाऱ्या चारी क्रमांक १३ व १४ च्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने चारी क्रमांक १३ चा कालवा फुटून परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केली आहे.
कालव्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याबाबत दोन महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही न करता संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ वरवरची चौकशी करून कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वसंतराव सकट यांनी केला आहे.
या कामामध्ये टक्केवारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला असून, कामाचा दर्जा जाणीवपूर्वक खालावण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक ते पाणी मारले जात नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. याबाबत शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित ठेकेदार यांना सूचित करूनही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कालवा फुटल्याची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. चारी फुटलेले शेतकऱ्यांचे नुकसान झाले जीवितहानी पासून शेतकरी बच्छाव
या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सकट यांनी केली आहे. वेळेत योग्य तपासणी करून ठेकेदाराला सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असत्या, तर हा अनर्थ टाळता आला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी केवळ टक्केवारीकडे लक्ष देऊन कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत, झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारून प्राणांतिक उपोषण करण्यात येईल, असा इशाराही वसंतराव सकट यांनी दिला आहे.
🔴🟢🟠🟣
