फुलवाडी येथे तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदा हि गाड्या ओढण्यात आल्या
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार ४ एप्रिल २०२६
जालना प्रतिनिधी: हरिश्चंद्र वाघमारे
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील फुलवाडी गावात चैत्र पौर्णिमेनिमित्त धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गावातील कुलदैवत आई तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवसाच्या गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
दुपारी साडेतीन ते सहा वाजेपर्यंत भाविकांनी नवसाच्या गाड्या ओढून देवीचे दर्शन घेतले. “आई तुळजाभवानी नवसाला पावते” अशी श्रद्धा असल्यामुळे परिसरातील अनेक भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
फुलवाडी गावात ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे ५९वे वर्ष साजरे करण्यात येत आहे.
गुरुवर्य लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर यांच्या कृपाशीर्वादाने भागवत कथा प्रवक्ते दत्ता महाराज लहुळकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेचे वाचन होणार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमामुळे फुलवाडी गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
🟣🔴🟢🟠
