महाराष्ट्राला हादरवणारी घटना! दूध भेसळीचा फॉर्मुला उघड..!
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
७ जुलै २०२६
नैसर्गिक दूध म्हणून महाराष्ट्राला विष पाजणाऱ्या भेसळयुक्त दुधावरील सर्वात मोठी कारवाई पुणे जिल्ह्यातील मंचर येथे उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीमने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मस्के यांनी मंचर येथे धाड टाकली. या कारवाईत सुशांत बबन हिंजे आणि त्यांच्या साथीदारांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले. सुशांत हिंजे यांच्याकडून १३०० किलो वजनाचे, सुमारे दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे दूध भेसळीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले. या मंचर धाडीत एकूण २९ संशयित आरोपी असून, त्यांची व्याप्ती पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि भिवंडी या सहा जिल्ह्यांपर्यंत पसरलेली आहे. प्राथमिक तपासात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नैसर्गिक दूध, डिटर्जंट पावडर, पाम तेल, व्हेजिटेबल ऑइल आदी पदार्थांचा वापर करून भेसळीचा एक फॉर्म्युला तयार केला जात होता. हा फॉर्म्युला या सहाही जिल्ह्यांतील दूध वितरण केंद्रांवर पुरविला जात होता. तेलामुळे दुधातील फॅटचे प्रमाण वाढविले जात होते, तर इतर रसायनांमुळे दुधाची चमक वाढवली जात होती. अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध सेवन केल्याने उच्च रक्तदाब, कर्करोग, पक्षाघात यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. गर्भवती महिलांनी असे दूध सेवन केल्यास गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे असे दूध म्हणजे विष पिण्यासारखेच आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातीलही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. याचे संपूर्ण श्रेय तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीमला जाते. त्यामुळे त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले पाहिजे. काल दुपारी बारा वाजल्यापासून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत एकूण २९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मंचर येथील एका छोट्याशा खोलीसदृश गोदामात हा दूध भेसळीचा फॉर्म्युला तयार केला जात होता. या धाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे विविध रासायनिक पदार्थही जप्त करण्यात आले. मंचर येथून विविध भागीदारांच्या माध्यमातून हा भेसळीचा फॉर्म्युला संबंधित दूध वितरण केंद्रांकडे पाठविला जात होता. महाराष्ट्रातील दूध भेसळीविरोधातील ही पहिली मोठी धाड असून, अशा प्रकारची आणखी किती केंद्रे कार्यरत आहेत, हे कालांतराने स्पष्ट होईल. सहा जिल्ह्यांमध्ये ही भेसळ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. भेसळ करण्यासाठी महागडी रसायने वापरली जात नव्हती. किरकोळ किमतीची रसायने दुधात मिसळून ते नैसर्गिक दूध म्हणून विकले जात होते. दूध विक्रेत्यांना त्यांच्या दुधातील फॅटचे प्रमाण वाढवायचे असल्याने ते त्यात व्हेजिटेबल ऑइल मिसळत होते. त्यामुळे फॅट वाढविणारा हा तयार फॉर्म्युला त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत होता आणि त्यांना अधिक दर मिळत होता. मंचर येथील धाडीची व्याप्ती सध्या सहा जिल्ह्यांपुरती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला, तर अशा प्रकारची आणखी अनेक भेसळ केंद्रे असण्याची शक्यता आहे. ती शोधून काढण्याचे मोठे आव्हान तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीमसमोर आहे. या कारवाईत सुमारे १३०० किलो वजनाचा दूध भेसळीचा फॉर्म्युला जप्त करण्यात आला. त्यानंतर तो आरोपींसमोरच एका शेतात नष्ट करण्यात आला. या प्रकरणी सविस्तर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यात २९ संशयित आरोपींची नावे नमूद करण्यात आली आहेत.
एका मंचर धाडीतच सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा काळाबाजार उघडकीस आला. मग महाराष्ट्रभर अशा प्रकारची किती भेसळ केंद्रे असतील आणि त्यातून किती हजारो कोटी रुपयांचा काळाबाजार होत असेल, याचा अंदाज येऊ शकतो. या धाडीनंतर दूध भेसळ करणारे सावध झाले असतील. काही दिवस ते आपला हा गोरखधंदा बंद ठेवतील, हे निश्चित. मात्र त्यामुळे दूध विक्रेत्यांकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे आणि राज्यात नेमक्या कुठे-कुठे भेसळ केली जाते, हेही स्पष्ट होऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत आहे आणि आपण नकळत ते विषच पित आहोत, याची अनेकांना कल्पनाही नाही. त्यामुळे या कारवाईसाठी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीमला श्रेय दिले पाहिजे. दुधातील, औषधांतील आणि अन्नातील भेसळ या अत्यंत गंभीर बाबी आहेत. गुटखा खाणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो; मात्र बंदी असलेल्या वस्तूंची विक्री होणे हे चुकीचेच आहे. भेसळखोरीचे हे एक वेगळेच जाळे असून, त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जात आहे. काळ्या पैशाच्या जोरावर अनेक गोष्टी विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा भेसळखोरांसाठी तुकाराम मुंढे हे कर्दनकाळ ठरत आहेत, हे निश्चित. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
🟣🟠🟢🔴
