धिरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तिर्डी आंदोलन; श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांचा तीव्र निषेध
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २७ एप्रिल २०२६
श्रीगोंदा, प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेड, समविचारी संघटना व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने तीव्र तिर्डी आंदोलन करण्यात आले. धिरेंद्र शास्त्री (बागेश्वर महाराज) व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविला.
या आंदोलनाची सुरुवात शहरातील शनी चौक येथून करण्यात आली. मोठ्या संख्येने शिवप्रेमी, कार्यकर्ते व नागरिक हातात फलक, घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाकडे मोर्चा घेऊन गेले. मार्गावर “शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही”, “वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध असो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतीकात्मक तिर्डी आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी तिर्डी बांधून ती तहसील कार्यालयाजवळील मुतारी येथे नेऊन प्रतीकात्मकरीत्या विसावा दिला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी धिरेंद्र शास्त्री व संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका करत, इतिहास व महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या बद्दल कोणतेही चुकीचे वक्तव्य सहन केले जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आम आदमी पार्टीचे नेते राजेंद्र नागवडे यांनीही आंदोलनात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली व निषेध नोंदविला. त्यांनीही संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा तसेच आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आणि कथित धमकीच्या घटनेचाही आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध केला.
या आंदोलनात बामसेफचे सुभाष बोराडे, सत्यशोधक विचारवंत भीमराव कोथिंबीर, आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष वैभव मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते बंडूतात्या जगताप, शहराध्यक्ष अभिषेक सावंत, अजिजभाई शेख, जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, जिल्हा संघटक गणेश पारे, दीपक मुखरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाकडे निवेदन देत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
🟣🔴🟢🟠
