Supreme Court Orders : नॅशनल हायवेवर आता ‘हे’ नियम पाळावेच लागणार; अपघातांचे बळी रोखण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन, Supreme Court नं काय दिला आदेश?
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार २८ एप्रिल २०२६
विश्व निर्माता न्यूज: सागली : राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या अपघातांचे धोके कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर ‘सुरक्षा कृती दल’ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले (Supreme Court road safety orders India) आहेत.
विश्व निर्माता न्यूज: जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग असून एक हरित द्रुतगती मार्ग नियोजित आहे.
महामार्गावरील अपघातांची संख्या आणि मृत्यू वाढत असल्याने या कृती दलाकडे विशेष लक्ष असणार आहे. हा विषय अत्यंत गांभीर्याने घेऊन कोणताही मुलाहिजा न ठेवता निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय महामार्गावर ‘राइट ऑफ वे’च्या आत नवीन ढाबे, हॉटेल्स, खानावळी किंवा व्यावसायिक इमारती उभारता किंवा चालवता येणार नाहीत. ऑगस्ट २०२५ च्या आदेशानुसार बेकायदा नव्या व जुन्या इमारती दोन महिन्यांच्या आत हटवाव्यात, असे निर्देश आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीशिवाय कोणालाही परवाना देऊ नये किंवा व्यवसाय करण्यास मुभा देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कृती दल स्थापन करताना प्रशासन, पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांच्या आत हे कृती दल स्थापन करायचे आहे.
सांगलीसाठी निर्णय महत्त्वाचा
सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वेगाने विस्तारत आहे. मात्र, नागरिकांना अशा गतिमान मार्गावरील नियमांची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे गंभीर परिणामांची जाणीवही कमी आहे. त्यामुळेच महामार्गावरील अपघातांची संख्या अधिक असून चारशेहून अधिक बळी गेले आहेत.
उलट दिशेने वाहन चालविणे, महामार्गावरून जनावरे नेणे, रस्त्याच्या कडेला अयोग्य पद्धतीने वाहने उभी करणे, तसेच रस्त्याच्या अगदी लगत व्यवसाय सुरू करणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. या सर्व पातळ्यांवर कठोर धोरण राबविण्याची गरज आहे.
अहवाल साद
पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांकडे जिल्ह्यातील महामार्गावरील अपघातांची कारणे, ठिकाणे आणि उपाययोजना याबाबत सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये पोलिस ठाणेनिहाय अपघातांची संख्या, तसेच ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग
पुणे-बंगळूर आशियाई मार्ग
रत्नागिरी-नागपूर मार्ग
सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्ग
नियोजित बारामती-संकेश्वर महामार्ग
विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग
नियोजित पुणे-बंगळूर हरित महामार्ग
गत वर्षी घडलेले अपघात
पोलिस ठाणे हद्द प्राणांतिक अपघात गंभीर अपघात
सांगली ग्रामीण १९ ४७
मिरज ग्रामीण ३० ४९
विटा २७ ३७
आटपाडी ३० ३०
कडेगाव १० ५
चिंचणी वांगी ४ ३
तासगाव ३९ ३३
कुंडल ६ ३
पलूस ७ ४
भिलवडी ७ १३
जत ३५ ४५
कवठेमहांकाळ ५७ ४२
उमदी २० १३
ईश्वरपूर ३० ३०
आष्टा २२ २६
शिराळा ७ १५
कोकरूड ३ ६
कुरळप १८ ७
कासेगाव ६ ७
