श्रीगोंद्यात काळ्या काचांविरोधात पोलिसांची धडक मोहीम; ७२ वाहनांवर कारवाई, ६३ हजारांचा दंड
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा | दि. १६ जून २०२६
मुख्य संपादक: वैभव हराळ
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्मविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ६३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार काही चारचाकी वाहनांवर काळ्या काचा लावून त्यांचा वापर विविध बेकायदेशीर कृत्यांसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याने कार सजावट व रेडियम व्यवसायिकांची बैठक घेऊन आरटीओच्या मान्यतेशिवाय काळ्या काचा बसवू नयेत तसेच एचएसआरपी (HSRP) क्रमांक प्लेटशिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या नंबर प्लेट तयार करू नयेत, अशा सूचना दिल्या. यासंदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
या विशेष मोहिमेत १३ वाहनांवरील काळी फिल्म काढण्यात आली. तसेच परवान्याविना वाहन चालविणाऱ्या २ चालकांवर, हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ८ जणांवर, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४ जणांवर, जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १ वाहनावर, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या १ वाहनावर, सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या २ चालकांवर, विनाक्रमांक वाहनांवर तसेच ४० नो-पार्किंग प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.
ही मोहीम पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबमें उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ जाधव व गोरख जाधव यांनी मोहिमेची अंमलबजावणी केली.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, बेकायदेशीर काळ्या काचा व अनधिकृत नंबर प्लेटचा वापर टाळावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्रीगोंदा पोलिसांनी दिला आहे.
🟠🟢🔴🟣
