श्रीगोंदा हादरले! अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 17 जून 2026
भारत प्रतिनिधी: नाहीद पठाण
श्रीगोंद तालुक्यातील वडाळी रोड परिसरात अल्पवयीन मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ याचे मृत मुलीसोबत प्रेमसंबंध होते. १५ जून रोजी दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपीने लोखंडी रॉड व फरशीच्या सहाय्याने मुलीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने मृतदेह घरात ठेवून आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह गादीत गुंडाळून वडाळी रोडलगतच्या जंगल परिसरात नेला. तेथे पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे घटनास्थळाची पाहणी करून आरोपी शुभम ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील खून, पुरावे नष्ट करणे तसेच संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मृत मुलीच्या आईने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत, “माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे,” असा आक्रोश व्यक्त केला. या अमानुष घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
🟠🔵🔴🟡
