नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजार उत्साहात संपन्न.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २५ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधि:-विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर नफा तोट्याचे गणित समजावे, व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने श्रीगोंदा येथील नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या या उपक्रमास पालक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे २४० फळे, भाजीपाला, स्टेशनरी, खेळ आणि खाद्यपदार्थांच्या छोट्या-मोठ्या स्टॉलच्या माध्यमातून तब्बल ३ लाख, ८२ हजार, ८६७ रुपयांची उलाढाल झाली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अनुराधाताई नागवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, कुठलाही व्यवसाय करत असताना त्याचे मार्केटिंग करता येणे आवश्यक असते. तसेच व्यवसायामध्ये दैनंदिन होणारे बदल लक्षात घेऊन अपडेट राहणे आवश्यक ठरते. परिस्थिती समोर हार न मानता सामना करून यश मिळवून आनंदी राहावे हेच जीवनाचे सत्य असल्याचे सांगितले.
केंद्रप्रमुख श्री.माणिक आढाव यांनी विद्यालयाची गुणवत्ता ही उच्च दर्जाची असल्याचे प्रतिपादन करून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगती बाबत शालेय प्रशासनाचे कौतुक केले.
प्रसंगी नाताळ सणाची आख्यायिका व देखावा सादर करण्यात आला. आनंदी बाजार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस पी गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ.नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन श्री.जयेश आनंदकर व सौ.धनश्री जोशी यांनी केले.