श्रीगोंदा पोलिसांचे ब्लॅक स्पॉट पेट्रोलिंग कधी? उघड्यावर मद्यपानामुळे नागरिकांमध्ये भीती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 17 जून 2026
भारत प्रतिनिधी: नाहीद पठाण
श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील मैदाने, पडीक इमारती, प्लॉटिंग परिसर, ओसाड जागा तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या काही ठिकाणी मद्यपींचा मुक्त वावर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः सायंकाळच्या वेळेत काही युवक आणि मद्यपींची टोळकी या ठिकाणी बसून मद्यपान करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. मद्यपानानंतर आरडाओरडा, शिवीगाळ, किरकोळ वाद, तसेच परिसरात काचांच्या बाटल्या आणि कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना या परिसरातून ये-जा करताना असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलिसांनी अशा संवेदनशील ठिकाणांची ओळख करून त्यांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करावे आणि त्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
कायद्याची भीती निर्माण होऊन सार्वजनिक शिस्त अबाधित राहण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
🔵🟠🟡🔴
